भरधाव दुचाकी चालविणे अल्पवयीन मुलाच्या जीवावर बेतले; बाबा पेट्रोल पंपाजवळील घटना

Foto

औरंगाबाद: ट्रिपलसीट भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला दुचाकीच्या  गतीवर नियंत्रण  मिळविता न आल्याने  झालेल्या अपघातात 15 वर्षीय शाळकरी मुलाचा  जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर बसलेले इतर दोघे जखमी झाले आहे. ही घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास बाबा पेट्रोल पंपा जवळ घडली. उर्वेश सुभाष जुमडे वय-15 (रा.राजनगर,मुकुंदवाडी) असे मृत मुलाचे नाव आहे. 

मृत उर्वेश हा संत मीरा विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिकत होता. आज जागतिक योग दिवस असल्याने  शाळेतील सात मित्रांनी विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा  टेकडी आणि लेणी परिसरात फेरफटका मारण्याचा बेत आखला होता. उर्वेश आणि त्याच्या सात मित्राना सकाळी तीन दुचाकीवरून जाण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे आज सकाळी उर्वेश ने त्याच्या दुचाकीवर दोन मित्राना बसविले होते. तर  इतर चार मित्र दोन दुचाकीवरून निघाले ही सर्व मुले आज सकाळी साडेसात वाजता घरातून निघाली होती. दोन्ही मित्रांची दुचाकी पुढे जात असल्याने उर्वेशने दुचाकीची गती वाढविली.  दरम्यान विद्यापीठ कडे जात असताना बाबा पेट्रोल पंपा जवळ येताच समोर  बस  ने ब्रेक मारला. त्यापाठोपाठ समोरील मित्राने दुचाकींचा ब्रेक लावला मात्र,   भरधाव वेगात असलेल्या उर्वेशला  दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही व त्याची दुचाकी मित्राच्या दुचाकीला जाऊन धडकली. या अपघातात तो सुमारे 20 फूट दूरवर जाऊन पडला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या  दुचाकीवर बसलेले दोन्ही मित्र किरकोळ जखमी झाले. या अपघात प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.